Wednesday, May 14, 2025

प्रबुद्ध हो मानवा

कनाकनानी  ज्ञान वेचुणी 
प्रबुद्ध हो मानवा 
प्रज्ञे चा ही प्रकाश दाविल 
मार्ग तुला रे नवा
प्रबुद्ध हो मानवा ||ध्रू||  

सिद्धार्थाच्या हृदयांतरी
ही ज्ञानज्योत चेतली
बुद्धमुखाने ह्या ज्योतीची
प्रभा जगी फाकली
त्या दीपाने तूही चेतवी
तव हृदयीचा दिवा
प्रबुद्ध हो मानवा ||१||

धम्मचिंतनी आचरणाची
कळेल तुज संहिता
अष्टमार्ग हे निश्चित
नेतील बुद्धत्त्वाच्या पथा
पंचशीलेचा निवास हृदयी
निर्वाणास्तव हवा
प्रबुद्ध हो मानवा ||२||

मनोभूमीतुनी तुझ्या
रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा
त्या शाखेची शीतल छाया
लाभावी बहुजना
करुणाप्रेरित कार्य तुझे
हे संजीवन दे जीवा
प्रबुद्ध हो मानवा ||३||

 

No comments:

Post a Comment